खरसुंडी प्रतिनिधी
भैरवनाथाच्या नावानं चांगभलं च्या गजरात खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात रात्री साडेबारा वाजता श्रीनाथ जन्मोत्सव संपन्न झाला. आज सकाळी नित्योपचार झाल्यानंतर जन्माष्टमी निमित्त श्रींची सदरेवरील बैठी सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. त्याचबरोबर गाभार्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती . सकाळी नऊ वाजता सोनारी ते खरसुंडी पायी दिंडीचे श्रीनाथ मंदिरात आगमन झाले. दुपारी श्री भैरवनाथ महात्म्य ग्रंथाचे समाप्ती करण्यात आली. सायंकाळी हनुमान मंदिरातच्या परिसरात उभारलेल्या मंडपात गावोगावा हून आलेल्या भाविकांनी आपली गायन सेवा रुजू केली. आठ वाजता उज्जैनहून आलेल्या श्रीनाथ भक्ती ज्योतीचे गावात आगमन झाले. पारंपारिक वाद्याच्या गजरात ही ज्योत श्रीनाथ मंदिरात आणण्यात आली. त्या ठिकाणी देवस्थान समितीच्या वतीने ज्योतीचे स्वागत करण्यात आले . रात्री जन्माष्टमी निमित्त रोहित महाराज देविखिंडीकर यांच्या कीर्तनास प्रारंभ झाला. साडेबारा वाजता शिंगाचा नाद झाल्यानंतर चांगभलं च्या गजरात पुष्पवृष्टी करण्यात आली . महिलांनी श्रीं चा पाळणा गायला. त्यानंतर फटाक्यांची प्रचंड आताषबाजी करण्यात आली .शेजारतीनंतर श्रींच्या उत्सव मूर्तीची पाळण्यातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. आज दिवसभर उपवासानिमित्त अन्नदान करण्यात आले. कार्यक्रमास माजी सभापती हर्षवर्धन देशमुख व पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी भेट देऊन दर्शन घेतले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. ता.६ रोजी ग्रंथ दिंडी,गोपाळ काला व कुस्ती मैदाना नंतर सोहळ्याची सांगता होणार आहे.