ब्रेकिंग न्यूज

चांगभलं गजरात खरसुंडी ता. आटपाडी येथील धाकटी जकाई देवीची त्रैवार्षिक यात्रा

खरसुंडी प्रतिनिधी 
चांगभलं गजरात खरसुंडी ता. आटपाडी येथील धाकटी जकाई देवीची त्रैवार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की श्री सिद्धनाथांच्या पत्नी धाकटी जकाई देवीची यात्रा तीन वर्षातून एकदा होत असते.
बलवडी घाटाच्या पायथ्याला सावकार दरयात जकाई देवीचे पुरातन मंदिर आहे. याठिकाणी यात्रेनिमित्त आज सकाळी देवीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवीची सिंहावर आरूढ सालंकृत पूजा बांधण्यात आली. तर मुख्य मंदिरामध्ये नित्योपचार झाल्यानंतर  श्रींची अश्वारूढ पूजा बांधण्यात आली .
            सकाळी साडेनऊ वाजता श्रींच्या पालखीचे जकाई भेटीसाठी मुख्य मंदिरातून प्रस्थान झाले. यावेळी गुलाबी रंगाची पेशवाई पगडी घातलेली उत्सव मूर्ती पालखीमध्ये विराजमान करण्यात आली होती .पालखीचा अग्रभागी असणारी धूप आरती व लवाजम्याने मुख्य मंदिरातून प्रस्थान केले. त्यानंतर जोगेश्वरी मंदिराजवळ ध्वज पूजन करण्यात आले. याठिकाणी असणाऱ्या पुरातन दीपमाळेवर भगवा ध्वज लावून ता.२३  रोजी होणाऱ्या जकाई यात्रेची सूचना देण्यात आली . त्यानंत पालखीने गतीने बलवडी रस्त्यावरून दरयात प्रस्थान केले .वाटेतील नागरिकांचे स्वागत स्वीकारून पालखी अकरा वाजता जकाई दरयात पोचहली. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने श्रींचे स्वागत करण्यात आले .पुरातन मंदिरात श्रीनाथ जकाई भेट झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. श्री सिद्धनाथ व धाकटी जकाई देवीच्या दर्शनानंतर भाविकांनी निसर्गरम्य वातावरणात महाप्रसादाचा लाभ घेतला . यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शिवानंद स्वामी प्रस्तुत भक्तीगीतांच्या कार्यक्रमास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. यात्रेदरम्यान खा. संजय काका पाटील, जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील ,माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, शंकर नाना मोहिते, काँग्रेसचे युवक अध्यक्ष जयदीप भोसले, चंद्रकांत भाऊ भोसले, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे ,  शिवसेना तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील ,राजु नांगरे, प्रणव गुरव ,बाळासाहेब होनराव आदींनी भेट देऊन दर्शन घेतले ,
       सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शनाकरिता भाविकांचा ओघ कायम होता .पाच नंतर पालखीने जकाई देवीचा निरोप घेऊन परतीसाठी प्रस्थान ठेवले .यावेळी पालखी मार्गावर भाविकांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वाटून श्रींचे स्वागत केले .पालखीच्या अग्रभागी दरबार बँडने दर्जेदार गीतांच्या माध्यमातून भाविकांचे मनोरंजन केले .पालखी गावठाण हद्दीत आल्यानंतर  फटाक्यांची आकर्षक आताषबाजी करण्यात आली. रात्री उशीरा पालखीचे मुख्य मंदिरात आगमन झाले. यात्रेच्या यशस्वीतेसाठी देवस्थान ट्रस्ट ,ग्रामपंचायत ,ग्रामस्थ व सेवेकरी ,मानकरी यांनी श्रम घेतले.
    यानंतर भाविकांना ता.२३ रोजी होणाऱ्या मानेवाडी व नेलकरंजी येथील जकाई यात्रेची ओढ लागली आहे.


Previous Post Next Post