आटपाडी प्रतिनिधी
जिहे - कटापुर योजनेचे पाणी तातडीने राजेवाडी तलावात सोडावे अशी मागणी खासदार संजय काका पाटील व माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणारा ऐतिहासीक राजेवाडी तलाव आटपाडी तालुक्यात आहे. सध्या या तालुका तलावातील पाणीसाठा संपला असून उन्हाळ्यामुळे लाभ क्षेत्रात पाण्याची मोठी टंचाई जाणवू लागली आहे. जिहे - कटापुर योजनेच्या माध्यमातून माण व खटाव तालुक्यातील गावांना पाणी सुरू आहे.
या योजनेमधूनच पुढे आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावात पाणी सोडावे व हा तलाव भरल्यास संभाव्य पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.
याबाबत खासदार संजय काका पाटील यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली आहे. यावेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समितीचे संचालक अमोल काटकर, अंकुश भोसले महाराज, शेखर इनामदार ,तसेच प्रभाकर बाबा पाटील उपस्थित होते.