आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील जेष्ठ नेते यशवंत उर्फ आण्णासाहेब शंकर पत्की वय 87 यांचे वृद्धापकाळाने अकराचे सुमारास रात्री निधन झाले. करगणी गावचे 28 वर्ष सरपंच,जिल्हा परिषद सदस्य,बाजार समितीचे सभापती अशा अनेक महत्वाच्या पदावर त्यांनी काम केले होते. कै.बाबासाहेब देशमुख कै.मोहनराव भोसले कै.उस्मान नबी शेख ,कै.अनिल भाऊ बाबर यांच्या सह कै.आर.आर.पाटील व कै.डाॅ.पतंगराव कदम आणि समकालीन नेतृत्वा बरोबर त्यांनी काम केले होते.जिल्हा परीषद सदस्य म्हणून काम पाहताना त्यांनी जलसंधारण व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपल्या कामाची जिल्हा भर छाप उमटवली होती.जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांचे ते राजकीय गुरू होते.कै.नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या बरोबर पाणी चळवळीत त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला होता.
आपल्या रांगड्या व परखड वक्तृत्व शैलीसाठी ते प्रसिद्ध होते.कमी शब्दांत लोकांचे प्रश्न मांडुन ते व्यासपीठ जिंकून टाकत असत.समाजातील सर्व स्तरामध्ये संपर्क हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते.त्यांच्या जाण्याने आटपाडी तालुक्यातील राजकीय व सामाजिक बदलांचा साक्षीदार हरपला आहे.
त्यांच्या पाठीमागे मुले ,मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.