खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरात हळदी समारंभाने चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. श्रीनाथ अष्टमी विवाह सोहळा ता. 1 मे रोजी तर सासणकाठी व पालखी सोहळा ता.५ मे रोजी होणार आहे.
आज सकाळी रामनवमीनिमित्त मुख्य मंदिरात श्रींची पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान केलेली हत्तीवर आरुढ पूजा बांधण्यात आली होती. त्यानंतर दुपारी श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर विधिवत पूजन करून तोरणं बांधण्यात आली. पारंपरिक थाटाच्या या तोरणांमुळे मंदिराच्या सजावटीत भर पडली आहे.
त्यानंतर रात्री नऊ वाजता चिंचाळे येथील मानकरयांचे मुख्य मंदिरात आगमन झाले. त्यानंतर मंत्रोपचाराच्या गजरात श्रींना हळद लावण्यात आली व श्रीनाथ बाळाई देवीस फुलांच्या मुंडावळ्या बांधण्यात आल्या. यावेळी नामदेव पाठक यांनी पौराहित्य केले. हळदी समारंभा नंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी मानकरी भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर नित्योपचारा नुसार धुपारती काढण्यात आली .रामनवमी नंतर भाविकांना ता.१ मे रोजी होणाऱ्या श्रीनाथ जोगेश्वरी विवाह सोहळ्याचे वेध लागले आहेत. प्रथेप्रमाणे आजपासून मंदिरामध्ये श्रीफळ न फोडता अर्पण करण्यास सुरुवात झाली आहे.