खरसुंडी प्रतिनिधी
आचारसंहिते नंतर खरसुंडी तीर्थक्षेत्र ब वर्गाचा प्रश्न निकालात काढू असे अश्वासन पालकमंत्री डॉ. सुरेश खांडे यांनी दिले. खरसुंडी ता. आटपाडी येथे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित तालुक्यातील गावभेट प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर ,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक मासाळ, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड ,सरपंच धोंडीराम इंगवले व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री.खाडे म्हणाले केंद्रातील सरकारमुळे आपल्या देशाची जगामध्ये पत वाढली आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केंद्र सरकारची अनेक बाबतीत मदत झाली आहे. त्यामुळे यावेळी नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संजय काकांना तिसऱ्या वेळी खासदार करावेच लागेल. त्यासाठी आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचले पाहिजे.
माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख म्हणाले की ही निवडणूक देशाच्या पातळीवरील आहे. त्यामुळे आप आपसातील सर्व मतभेद विसरून आपण संजय काकांच्या पाठीमागे उभे राहावे. केंद्र व राज्य सरकारच्या सिंचन योजना बाबतच्या धोरणांमुळेच आपल्या तालुक्याला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत नाही. सिंचनाच्या उर्वरित प्रश्नांसाठी सर्वांनी भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभे राहावे .
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले की मी कै. अनिल भाऊ बाबर यांचा प्रतिनिधी म्हणून आपणास सांगतो ही निवडणूक देशाच्या प्रश्नाबाबत आहे, यामध्ये आपले स्थानिक हेवेदावे महत्त्वाचे नाहीत .त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता आपण महायुतीच्या उमेदवारास मतदान करा .
उमेदवार श्री संजय काका पाटील म्हणाले की श्री सिद्धनाथाच्या आशीर्वाद व लोकांचे प्रेम यामुळे गेले दहा वर्ष आपला लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत काम करू शकलो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या भागातील सिंचन योजना रस्ते व अन्य प्रश्नांना न्याय देता आला .या मतदार संघांमध्ये सर्व गट बरोबर असल्याने अतिशय चांगले वातावरण आहे .
कार्यक्रमास बाजार समितीचे संचालक शंकर भिसे, विलास काळेबाग ,प्रमोद धायगुडे ,प्रणव गुरव प्रमोद शेंडगे, ऋषिकेश देशमुख, देवस्थान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी यांच्यासह पश्चिम भागातील गावांचे विविध पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
आज दिवसभरात त्यांनी नेलकरंजी, खरसुंडी, करगणी, शेटफळे, आटपाडी, निंबवडे, राजेवाडी, दिघंची येथे मतदारांशी संवाद साधला.