खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता. आटपाडी येथील चैत्र यात्रेमध्ये श्रीनाथ अष्टमीनिमित्त श्रीनाथ जोगेश्वरी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.काल सकाळी विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरात श्रींची अश्वारूढ पूजा बांधण्यात आली होती. तर जोगेश्वरी मंदिरात देवीची हत्तीवर व सिंहावर अरुढ पूजा बांधण्यात आली होती. सकाळपासून गावातील सर्व नागरिकांनी सिद्धनाथांना महानैवेद्य अर्पण करण्यास सुरुवात केली तर जोगेश्वरी मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती.
सायंकाळी पाच वाजता विवाह सोहळ्यासाठी मेटकरी मानकरांचे मुख्य मंदिरात आगमन झाले .त्यानंतर श्रींच्या पालखीने मुख्य मंदिरातून विवाह सोहळ्यासाठी प्रस्थान केले, पालखी जोगेश्वरी मंदिराजवळी व्यासपीठावर आल्यानंतर सोहळ्यास प्रारंभ झाला.
सुरुवातीस गणेश पूजन झाल्यानंतर श्रीनाथ जोगेश्वरीस फुलांच्या मुंडावळ्या बांधण्यात आल्या. त्यानंतर मंगलाष्टकांच्या सुरात विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी सांगली येथील मुळे बंधूंच्या सनई वादनाने उपस्थित यांची मने जिंकली. विवाह नंतर फटाक्यांची आतषबाजी बाजी करण्यात आली. यावेळी नामदेव पाठक व सागर उपाध्ये यांनी पौरु केले .
त्यानंतर परंपरेनुसार मेटकरी मानकरयांच्या उपस्थितीत वेताळबा मंदिर, बगाडाचा म्हसोबा, रणखांब या मार्गावरून धुपारती व बगाड मुख्य मंदिरात परतले त्या ठिकाणी आगामी यात्रेत मोठी गर्दी व भागात चांगला पाऊस होईल अशी भाकणूक करण्यात आली. श्रीनाथ जोगेश्वरी विवाह सोहळ्यानिमित्त आज दिवसभर भाविकांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला .कार्यक्रमाचे संयोजन ग्रामस्थ व देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले होते. भाविकांना आता पाच मे रोजी होणाऱ्या सासणकाठी व पालखी सोहळ्याचे वेध लागले आहेत.