खरसुंडी प्रतिनिधी
चांगभलं च्या गजरात सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासणकाठी व पालखी सोहळा संपन्न झाला.
आज पहाटे मुख्य मंदिरात नित्योपचार झाल्यानंतर श्रींची अश्वारूढ तर उत्सवमूर्तीची सदरे वरील पूजा बांधण्यात आली होती. सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत धुपारती संपन्न झाली. आज सकाळ पासून गावोगावच्या सासणकाठ्या व भाविक मोठ्या संख्येने खरसुंडीत दाखल झाले होते. दुपारनंतर भाविकांची मुख्य मंदिरात गर्दी वाढू लागली. दोन वाजता मानाच्या आरत्या व नैवेद्य दाखवण्यास सुरुवात झाली. अडीच वाजता देवस्थानचे मानकरी आटपाडीचे हर्षवर्धन देशमुख यांचे मुख्य मंदिरात आगमन झाले. त्यांनी श्रींचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य सोहळा सुरुवात झाली. अग्रभागी धुपारती, भालदार ,चोपदार, सेवेकरी मानकरी अशा पारंपारिक व शाही थाटाचा लवाजम्यासह पालखीने मुख्य मंदिरातून प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून मंदिरा समोरील परिसरात पालखी आल्यानंतर भाविकांनी चांगभलेच्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण केली. पालखी मुख्य पेठेत आल्यानंतर दुतर्फा असणाऱ्या भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण सुरू केली . चांगभलंच्या जयघोषात पालखी महादेव मंदिराजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित सर्व सासणकाठ्या पालखीला टेकवून मानवंदना देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात मानपान झाल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. त्यापूर्वी मानाच्या टकऱ्या घडशाने देवाच्या लोखंडी सासनाला टक्कर दिली. चार वाजता पालखी मुख्य मंदिरात परतल्यानंतर प्रथेप्रमाणे मंदिरात श्रीफळ वाढवण्यास सुरुवात झाली. लोकसभा निवडणूक व प्रचंड उष्मा यामुळे सकाळच्या सत्रात भाविकांची गर्दी कमी होती.मात्र दुपारी गर्दीने उच्चांक केला. यात्रेच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत, महसूल, देवस्थान ट्रस्ट पोलीस प्रशासन ,सेवेकरी ,मानकरी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. उद्या दुपारी दोन वाजता रथोत्सव होणार आहे .रात्री उशिरापर्यंत मुख्य मंदिरात भाविकांची दर्शनाकरिता गर्दी होती. यात्रेनिमित्त आलेले फिरते विक्रेते ,मेवा मिठाईची दुकाने, शेती उपयोगी हत्यारे व अवजारे ,रसवंतीगृह यांना ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात्रेनिमित्त ठिकठिकाणी भाविकांनी अन्नदान व पाणी वाटप केले.
पोलीस बंदोबस्ताचे अपुरे नियोजन
लोकसभा निवडणुकीमुळे यात्रेसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध नव्हता मात्र उपलब्ध बंदोबस्ताचे अचूक नियोजन झाले नसल्याचे ठीक ठिकाणी दिसून आले .
पालखीने मार्ग बदलला
नगारखाना इमारतीतून बाहेर आल्यानंतर पालखी मारुती मंदिर व सरनोबत मंदिर मार्गे मुख्य पेठेत येते मात्र यावर्षी पालखी नगारखाना इमारतीतून थेट मुख्य पेठेत आल्याने भाविकांनी आश्चर्य व्यक्त केले.