आटपाडी प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत आटपाडी तालुक्यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील 37 गावांमध्ये आघाडीवर तर भाजपाचे संजय काकांना केवळ 24 गावांमध्ये आघाडी मिळाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना एकाही गावात आघाडी मिळाली नाही .
या निकालाच्या आकडेवारीवरून सदरचा निकाल भाजपाला चिंतन करावयास लावणारा व शिवसेनेला कै.अनिल भाऊंच्या पश्चात बळ देणारा ठरला आहे. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने पूर्णपणे सत्तेच्या बाहेर असणारी काँग्रेस राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे.
भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांच्या पाठीमागे आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, ब्रह्मानंद पडळकर ,हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील , ॲड.वैभव पाटील, विनायक मासाळ यांच्यासह महायुतीतील सर्वांनीच मोठ्या ताकद उभा केली होती. त्यामुळे या मतदारसंघात तीस हजारांहून अधिक मताधिक्याचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र ही निवडणूक जनतेने हाती घेतल्याने तालुक्यात विशाल पाटील यांनाच मताधिक्य मिळाले आहे.
तालुक्यातील विभूतवाडी, खरसुंडी, धावडवाडी ,आवटेवाडी, घुलेवाडी, नेलकरंजी, मानेवाडी, जांभुळणी, कुरुंदवाडी ,झरे, कामथ, गोमेवाडी, हिवतड, काळेवाडी, बनपुरी, मुढेवाडी, निंबवडे, लिंगीवरे, राजेवाडी, दिघंची, आवळाई, गळवेवाडी, माळेवस्ती,शेटफळे, भिंगेवाडी, पुजारवाडी दिघंची, उंबरगाव, विठलापूर, आटपाडी (पुजा), कौठुळी, पिंपरी खुर्द, बोंबेवाडी, खांजोडवाडी ,यप्पावाडी. माडगूळे,करगणी या ३७ गावांमध्ये विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. तर उर्वरित गुळेवाडी ,पिंपरी बुद्रुक,पडळकर वाडी, पारेकरवाडी ,घरनिंकी, वलवण, चिंचाळे, मेटकरवाडी, गुलालकी, खानजोडवाडी, घाणंद, पारेकरवाडी, वाक्षेवाडी, मिटकी, बाळेवाडी, तळेवाडी ,तडवळे, पात्रेवाडी, मासाळवाडी ,लेंगरेवाडी ,देशमुख वाडी ,शेरेवाडी, आंबेवाडी, शेंडगेवाडी या 23 गावांमध्ये संजय काका पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे.भाजपाचे प्राबल्य असणाऱ्या या तालुक्यात विशाल पाटील यांना मिळालेले मताधिक्य लक्षणीय आहे. विशाल पाटील यांना शेटफळे गावांमध्ये सर्वाधिक ९०३ मत्ताधिक्य मिळाले आहे. तर झरे येथे मिळालेले २४१ मतांचे मताधिक्य चर्चेचा विषय ठरला आहे. गत वेळेच्या निवडणुकीमध्ये संजय काकांना १२ गोपीचंद पडळकर यांना ५५ तर विशाल पाटील यांना केवळ ४ गावांमध्ये आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपचे परडे जड दिसत असताना प्रत्यक्षात वेगळा निकाल बाहेर पडला आहे .
शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना एकाही मतदान केंद्रावर तीन अंकी आकडा पार करता आला नाही. शेंडगेवाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला होता मात्र या ठिकाणी झालेली दोन मते संजय काकांना मिळालेली आहेत. खरसुंडी, दिघंची, करगणी, आटपाडी यासह तालुक्यातील प्रमुख गावात विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले असल्याने त्या ठिकाणची भाजपची फौज निकामी ठरली आहे .
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आटपाडी तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या दृष्टीने आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यामध्ये जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर
तालुक्याच्या पश्चिम भागात जयदीप भोसले यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
मतदार संघातील मताधिक्य व हालचाली पाहता आगामी विधानसभेत आटपाडी तालुक्यातील उमेदवारातच सामना होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.