महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथ देवस्थानला शासनाकडून ब वर्ग दर्जा घोषित करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ .सुरेश खाडे यांच्या पुढाकरांनी 33 वर्षांचा प्रश्न निकालात.
खरसुंडी प्रतिनिधी.
खरसुंडी ता. आटपाडी येथे श्री सिद्धनाथांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी वर्षभरामध्ये लाखो भावीक भेट देत असतात या तीर्थक्षेत्रावर येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा मिळण्यासाठी खरसुंडीचा ब वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश होणे आवश्यक होते .मात्र या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाची अनास्था व दुर्लक्ष यामुळे हे काम गेली अनेक वर्ष रेंगाळत पडले होते. सन 2013 मध्ये तत्कालीन आमदारॲड. सदाशिवराव पाटील यांनी याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्याने याचा पाठपुरावा झाला नाही.
गतवेळच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आ. गोपीचंद पडळकर यांच्या सूचनेनुसार या कामाला गती मिळाली. त्यानुसार विद्यमान लोकनियुक्त सरपंच धोंडीराम इंगवले व ग्रामपंचायत प्रशासनाने दिनांक ८ डिसेंबर 2023 रोजी याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव प्रधान सचिव ग्रामविकास व जलसंधारण विभाग मुंबई यांना सादर केला.
त्यानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचे खरसुंडी सिद्धनाथ हे कुलदैवत असल्याने त्यांनी या प्रश्नाबाबत विशेष लक्ष व पाठपुरावा केला. दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी याबाबत त्यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून तात्काळ निर्णय घेणे बाबत आग्रह धरला. त्यानुसार सदरचा प्रस्ताव दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उप समितीमध्ये मंजूर करण्यात आला. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने याबाबतचा शासन आदेश निघाला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आटपाडी तालुक्यात हा प्रचाराचा मुद्दा बनला होता.
त्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. याबाबतचे पत्र पालकमंत्री डॉ .सुरेश खाडे यांचे कडून सरपंच धोंडीराम इंगवले यांनी स्वीकारले आहे .
खरसुंडी तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जाला विलंब का. ?
सन 1990 क वर्ग दर्जा प्राप्त.
सन 2013 मध्ये तत्कालीन आ. ॲड. सदाशिवराव पाटील यांचे कडून शासनाला प्रस्ताव सादर.
ता.८ डिसेंबर 2023 ग्रामपंचायत कडून पुन्हा शासनाला प्रस्ताव सादर.
ता.२९ डिसेंबर 2023 राज्य उपसमितीच्या बैठकीत ब वर्ग दर्जाला मान्यता.
ता.१९ जुलै 2024 शासन आदेश जारी.
खरसुंडी तीर्थक्षेत्राला ब वर्ग दर्जा मिळण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील, स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शासनाकडे शिफारस केली होती.
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत अखेर 33 वर्षांनी खरसुंडीस ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्याने ग्रामस्थ व भाविकांत समाधान व्यक्त होत आहे.
खरसुंडी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात काय आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने शासनाला 18 कोटी 50 लाख रुपयांचा विकास आराखडा सादर करण्यात आला आहे.त्यामध्ये
१) भक्तनिवास बांधकाम 1 कोटी 96 लाख
२) आर सी सी गटर व रस्ता 2 कोटी 32 लाख
३) ट्रेमिक्स रस्ता 40 लाख.
४) कंपाउंड भिंत व पेविंग ब्लॉक 1 कोटी 63 लाख.
५) सुलभ शौचालय 58 लाख.
६) गावअंतर्गत स्वच्छतागृहे 95 लाख.
७) दुकान गाळे व भक्तनिवास 1 कोटी 38 लाख.
८) व्यासपीठ, शौचालय, दुकान गाळे 86 लाख
९) वांहनतळ, सभागृह ,भक्तनिवास 1 कोटी 88 लाख.
१०) स्वागत कमान 38 लाख.
११) हायमास्ट दिवे 39 लाख
१२) बगीचा 41 लाख.
१३) सोलर विद्युत व्यवस्था 39 लाख
१४) सीसीटीव्ही व्यवस्था 14 लाख.या कामांचा समावेश आहे.
ब वर्ग देवस्थान दर्जा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी सुरुवातीस पाच कोटींचा निधी देण्याची शासन व्यवस्था आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने निधीची उपलब्धता झाल्यानंतर आराखड्यातील सर्व मार्गी कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी हा निधी मंजूर होऊन कामे सुरू व्हावीत अशी ग्रामस्थ व भाविकातून अपेक्षा व्यक्त होत आहे. शासनाकडून खरसुंडीस ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा घोषित झाल्यानंतर खरसुंडीत ग्रामस्थांच्या वतीने फटाक्यांची आताषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला.