आटपाडी प्रतिनिधी
खानापूर मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने झरे व शेटफळे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास व बनपुरीत उपकेंद्रास तसेच पेड येथे तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास विशेष बाब म्हणून आज मान्यता दिली आहे.
याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी वेळोवेळी सभागृहात व मुख्यमंत्री ,आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे आमदार पडळकर यांनी आज सह्याद्री अतिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले आहे .यावेळी आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते.
शासनाच्या या निर्णयामुळे शेटफळे येथील नागरिकांची मोठी सोय होणार असून आरोग्य सेवेसाठी करगणी किंवा आटपाडी येथे पायपीट करावी लागणार नाही. तसेच झरे येथील नागरिकांना 17 किलोमीटर अंतरावर खरसुंडी येथे आरोग्य सेवेसाठी जावे लाग होते. शासनाच्या या निर्णयामुळे दोन्ही गावातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर पेड ता. तासगाव येथे होणाऱ्या तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचा विसापूर सर्कलमधील नागरिकांनाही फायदा होणार आहे.