खरसुंडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील बसस्थानक परिसरातील मातंग समाजातील नागरिकांनी सांडपाण्याच्या प्रश्नावरून अचानक रस्ता रोको केला. त्यामुळे प्रशासनाची काही काळ तारांबळ उडाली मात्र ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सरपंच धोंडीराम इंगवले यांनी तातडीने काम सुरू करण्याच्या आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी खरसुंडी येथे जि प शाळा नंबर एकच्या परिसरात मातंग समाजातील नागरिकांची घरे आहेत. मात्र या ठिकाणी गटाचे काम अपूर्ण असल्याने सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरून आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत संबंधित नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती मात्र ती पूर्ण होत नसल्याने आज सायंकाळी महिला, पुरुष,व लहान मुले यांनी आटपाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिय्या मांडून वाहतूक रोखली.यावेळी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष शेखर निचळ आंदोलनात सहभागी झाले होते.
अचानक झालेल्या आंदोलनामुळे स्थानिक प्रशासनाची तारांबळ उडाली पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आंदोलक काम सुरू करण्यावर ठाम असल्याने ग्राम पंचायत प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या साह्याने पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले व 20 तारखेला गटराचे प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे आश्वासन दिले यामुळे संबंधित नागरिकांनी सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.