ब्रेकिंग न्यूज

शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांना अखेरचा निरोप. शासकीय इतमामात विभूतवाडी ता . आटपाडी येथे अंत्यसंस्कार.

आटपाडी प्रतिनिधी 
विभूतवाडी ता. आटपाडी येथील सुपुत्र व केंद्रीय राखीव दलातील शहीद हवालदार काकासाहेब पावणे यांना भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला .त्यांचेवर पूर्ण शासकीय इतमामात  विभुतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज सकाळी आटपाडी येथे त्यांचे पार्थिव आल्यानंतर सजवलेल्या वाहनातून ते  विभुतवाडीकडे  रवाना करण्यात आले यावेळी जागोजाग निंबवडे झरे येते नागरिकांनी त्यांना आदरांजली वाहिली. विभूतवाडी येथे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर पार्थिव त्यांचे निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर विभूतवाडी हायस्कूलच्या पटांगणात संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या एन.सी.सी.च्या छात्रांनी मानवंदना दिली. तसेच केंद्रीय राखीव दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड .वैभव पाटील ,माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर ,हणमंतराव देशमुख, यांच्यासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी श्रद्धांजली वाहताना आमदार पडळकर म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीमध्ये काकासाहेब पावणे हे सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे बलिदान तालुक्याला सदैव प्रेरणा देईल. 
माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख म्हणाले की तालुक्याला अभिमान वाटावे असे काकासाहेब पावणे यांना वीरमरण आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण तालुका सहभागी आहे. 
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष केले जात आहे या पार्श्वभूमीवर सैन्य दलाकडून केंद्रीय राखीव दलाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये एका कारवाई दरम्यान इमारतीवरून पाय घसरल्याने हवालदार काकासाहेब पावणे यांना काल वीरमरण आले. त्यानंतर आज  एका विशेष विमानाने त्यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले तद्नंतर  विभूतवाडीकडे रवाना करण्यात आले.


विभुतवाडी ता.आटपाडी येथील शहीद जवान काकासाहेब पावणे यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी श्रद्धांजली व्यक्त करताना आ.गोपीचंद पडळकर ,माजी आ.राजेंद्र आण्णा देशमुख व मान्यवर.

Previous Post Next Post