आटपाडी प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीत खासदारांची ताकद सुहास बाबर यांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही खासदार विशाल पाटील यांनी आटपाडीतील कार्यक्रमात दिल्याने महाविकास आघाडीत पुन्हा बिघाड होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की आटपाडी येथील आठवडा बाजारात माडग्याळ जातीच्या पाच मेंढ्यांची तब्बल 19 लाखांना विक्री झाली. त्यामुळे शेतकरी सोमनाथ जाधव व खरेदीदार उत्तम शेठ पुजारी यांच्या सत्काराचे आयोजन बाजार समितीच्या वतीने खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील,तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भोसले,सभापती संतोष पुजारी, उपसभापती राहुल गायकवाड व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार पाटील यांनी शेतकरी व खरेदीदार यांचे अभिनंदन करून बाजार समितीला राज्य, केंद्र व खासदार फंडातून मदती बाबत आश्वाशीत केले .त्याचबरोबर ज्याप्रमाणे या ठिकाणी मेंढ्यांना विक्रमी दर मिळाला त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत सुहास बाबर यांना लाखोंच्या संख्येने विक्रमी मतदान मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आपण अपक्ष असल्याने आपणास कोणतेही बंधन नसून याबाबी मी स्पष्ट केल्या आहेत. जेथे आमच्यावर प्रेम दिसते तेथे प्रेम द्यायचे आम्हाला कळते, त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी ठाम उभे राहणार असे त्यांनी जाहीर स्पष्ट केले.
अपक्ष व काँग्रेसचे सहयोगी सदस्य असलेल्या खासदार पाटील यांनी शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडीत लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणुका तुर्तास लांबणीवर गेल्या असल्या तरी खासदारांच्या आजच्या भाषणा मुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.