ब्रेकिंग न्यूज

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आ. गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलेल्या रस्ता रोकोस आटपाडी तालुक्यात मोठा प्रतिसाद. ठिकठिकाणी शेळ्या मेंढ्यांसह धनगर बांधव रस्त्यावर.

आटपाडी प्रतिनिधी 
 धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती लागू कराव्यात यासाठी पंढरपूर जि. सोलापूर येथे समाजबांधव उपोषण करत आहेत. त्या लढ्याला बळ मिळावे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभर रस्ता रोको करण्याचे आवाहन केले होते. त्यास आज तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.
  आटपाडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, खरसुंडी येथे बस स्थानक परिसर,नेलकरंजी येथे नेलकरंजी फाटा, बनपूरी येथे मुख्य चौक, झरे बसस्थानक चौक, करगणी मुख्य चौक या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी धनगर समाज बांधवांनी आपल्या शेळ्या मेंढ्यांसह रस्त्यावर ठिया मारल्याने सर्वत्र चक्काजाम झाला व वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी त्यांनी ढोलांच्या निनादामध्ये  येळकोट येळकोट जय मल्हार चा एल्गार करीत धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे, धनगर एकजुटीचा विजय असो ,आमदार गोपीचंद पडळकर जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. 
आंदोलनामध्ये ठीक ठिकाणी जयवंत सरगर, विष्णुपंत अर्जुन, चंद्रकांत काळे, विलास काळेबाग, कैलास शेंडगे, विलास जानकर, मोहन पडळकर, गजानन खरात ,दिलीप चोपडे नवनाथ कटरे ,जगन्नाथ पडळकर दिलीप खिलारी, महादेव पाटील संजय यमगर, राजेंद्र यमगर, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण सरगर, उत्तम माने ,बाळासाहेब सरगर, नाथा सरगर ,आदींनी सहभाग घेतला.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ठीकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आटपाडी येथे आंदोलकाच्या वतीने तहसीलदार सागर ढवळे व पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 
                                       धनगर समाजाच्या मागण्या 
१) राज्य सरकारने तात्काळ धनगड दाखले रद्द करावेत.
२) आदिवासी जमातीचे सात टक्के आरक्षण आबादीत ठेवावे.
३) धनगर जमातीच्या एस.टी.    आरक्षणाचा शासन निर्णय तात्काळ जाहीर करावा.
४) अनुसूचित जाती व जमातींच्या वर्गीकरणाचे अधिकार माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत त्याची अंमलबजावणी करा. 
५) धनगर समाजाचे भटक्या जमाती क मधील 3.50% आरक्षण अनुसूचित जमाती ब 3.50% असे  करण्यात यावे.




खरसुंडी ता.आटपाडी येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाज बांधवांनी बस स्थानक चौकात शेळ्या मेंढ्यांसह रस्त्यावर ठिय्या मांडला.

Previous Post Next Post