आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ नवरात्रोत्सवा दरम्यान शनिवार ता. १२ रोजी विजयादशमी निमित्त साखर वाटप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उत्तर रात्री फेरपूजे निमित्त श्रींच्या उत्सव मूर्तीची व्यंकटेश (बालाजी) रूपातील पूजा बांधण्यात आली .
शुक्रवार ता.११ रोजी दुपारी घट उत्थापन झाल्यानंतर रात्री पालखीचे हरजागरासाठी जोगेश्वरी मंदिरात आगमन झाले. या ठिकाणी श्रींच्या उत्सव मूर्तीची सदरे वरील बैठी पूजा बांधण्यात आली तर जोगेश्वरी देवीची व्याघ्र व गरुडावर आरूढ पूजा बांधण्यात आली होती. ता.१२ रोजी विजयादशमी निमित्त परंपरेनुसार भाविकांनी साखर वाटपास प्रारंभ केला. आपल्या इच्छाशक्ती नुसार भाविक विविध वाहनातून साखर वाटप करत होते. यावेळी मुख्य चौकात लेझीम व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .दुपारी पालखी सोहळा मुख्य मंदिरात परत आला त्यानंतर सायंकाळी गाव सिमोलंघ्घन संपन्न झाले.
उत्तर रात्री फेर पूजे निमित्त प्रथमच श्रींच्या उत्सव मूर्तीची व्यंकटेश (बालाजी) रूपातील पूजा बांधण्यात आली होती.
या पूजेच्या निमित्ताने भाविकांना श्री सिद्धनाथांच्या बरोबरच व्यंकटेश्वराच्या दर्शनाचा आनंद मिळाला .विविध आभूषणे व आकर्षक सजावट यामुळे या पूजेने भाविकांचे लक्ष वेधून घेतले .या पूजेने नवरात्र उत्सवातील पूजेची सांगता करण्यात आली .रविवार ता. १३ रोजी चिंचाळे हद्दीतील देव सिमोलंघ्घन सोहळा संपन्न होणार असून दुपारी तीन वाजता पालखीचे मुख्य मंदिरातून चिंचाळे कडे प्रस्थान होणार आहे.