आटपाडी प्रतिनिधी
खरसुंडी ता.आटपाडी येथील श्री सिद्धनाथ नवरात्रोत्सवास गुरुवार ता. तीन रोजी घटस्थापनेने सुरुवात झाली आहे . धुपारती मार्गावर भव्य मंडप, विद्युत रोषणाई, उत्सव मूर्तीची विविध रूपातील सालंकृत पूजा यामुळे वातावरण मंगलमय बनले आहे. नवरात्रोत्सवा दरम्यान पहिल्या दिवशी सदरेवरील, दुसऱ्या दिवशी नंदीवर तर आज तिसऱ्या दिवशी श्री सिद्धनाथांच्या उत्सव मूर्तीची काळवीटावर आरुढ पूजा बांधण्यात आली. उत्तर रात्री बांधण्यात येणाऱी ही पूजा पाहणेसाठी पहाटे भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होत आहे. आज रविवार आणि नवरात्र उत्सव असा योग साधून महाराष्ट्र व कर्नाटकातील असंख्य भाविकांनी कुलदैवत श्री सिद्धनाथाच्या दरबारात हजेरी लावली. नवरात्र उत्सवाच्या निमित्त भाविकांकडून तेल, फराळाचे साहित्य, श्रीफळ इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात अर्पण करण्यात येत आहेत.