आटपाडी प्रतिनिधी
बहुचर्चित व लक्षवेधी ठरलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात सर्व अंदाज फोल ठरवत महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सुहास अनिल भाऊ बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्यावर ७७९२८ मतांनी मात करत विजय मिळवला आहे .
सुहास बाबर यांचा हा विजय स्वर्गीय अनिल भाऊ यांनी केलेले कार्य, टेंभूचा सहावा टप्पा, लाडकी बहीण योजनेचे फलित आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सुहास बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. विरोधकावर फारशी टीका न करता विकास कामावर भर दिला होता .मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुहास बाबर हे आघाडीवर होते .विटा शहरात मिळालेल्या मताधिक्याने त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले .
वैभव पाटील यांनी ही निवडणूक जिंकायच्या निश्चयाने लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तिकीट मिळाल्याने त्यांचा उत्साह दुनावला. मात्र आटपाडीतून माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी बंडखोरी केल्याने त्यांना आव्हान निर्माण झाले. अंतिम टप्प्यात त्यांना भाजपचे आमदार पडळकर गटाने पाठिंबा दिल्याने "सांगावा आलायं" ही टॅगलाईन बनली होती मात्र प्रत्यक्षात त्याचा उपयोग झाला नसल्याचे दिसून येते.
अपक्ष उमेदवार माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी दोन्ही उमेदवारापुढे आव्हान निर्माण केले होते .आटपाडीच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन त्यांनी तालुका एकवटला होता. मात्र प्रत्यक्षामध्ये हा मुद्दा लोकांना पटला नसल्याचे दिसून येते.
सुहास बाबर यांच्या या यशामध्ये काँग्रेसचे नेते अशोक गायकवाड, धर्मेश पवार ,जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, विनोद गुळवणी,अशोक गायकवाड ,आटपाडीतून जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयदीप भोसले,आर.पी.आय.अध्यक्ष राजेंद्र खरात याचा मोलाचा वाटा आहे.