ब्रेकिंग न्यूज

खरसुंडी येथील खिलार जनावरांच्या यात्रेस शेळ्या मेंढ्यांच्या व्यवहारांने सुरुवात. सिध्दनाथांचे शिकारीसाठी प्रस्थान.

खरसुंडी प्रतिनिधी

खरसुंडी येथील खिलार जनावरांच्या यात्रेस आज शेळ्या मेंढ्यांच्या खरेदी विक्रीने प्रारंभ झाला. बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून व्यवहारांना सुरुवात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र, कर्नाटक ,आंध्र या तिन्ही राज्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या खरसुंडी येथील खिलार जनावरांच्या पौष यात्रेस आज सुरुवात झाली. सुरुवातीस वीज मंडळा समोरील तळावर शेळ्या मेंढ्यांची खरेदी विक्री करण्यात आली. बाजारामध्ये लहान बोकड व गाभण शेळ्यांना चांगली मागणी झाली. गतवर्षीच्या तुलनेने बाजारातील दरात स्थिरता आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात सुमारे वीस लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान खिलार जनावरांच्या यात्रेत मोठ्या प्रमाणावर आवक आहे. प्रामुख्याने सांगलीसह नजीकच्या कोल्हापूर ,सातारा, पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर जनावरे दाखल होत आहेत. बैलगाडी शर्यतीच्या अनुषंगाने बाजारात दाखल होत असलेल्या खोंडांना विक्रमी मागणी होत आहे. मंगळवार व बुधवार बाजारामध्ये मोठी उलाढाल होण्याचा अंदाज आहे.

श्रींचे काशी क्षेत्राकडे पालखी सोहळ्याने प्रस्थान.

क्षेत्र खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ पौष पौर्णिमेला काशी क्षेत्राकडे शिकारीसाठी जातात व माघ पौर्णिमेस परत येतात अशी परंपरा आहे. त्यानुसार आज रात्री मुख्य मंदिरात पालखी सोहळा संपन्न झाला. सरनोबत मंदिराजवळ पालखी सोहळा आल्यानंतर तलवार टाकून शिकारीची दिशा निश्चित करण्यात आली .जोगेश्वरी मंदिरातून पालखी मुख्य मंदिरात परत आल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. यावेळी देवस्थानचा लवाजमा, सेवेकरी ,मानकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://youtube.com/shorts/wC5wMe-7Ip4?feature=shared

Previous Post Next Post