ब्रेकिंग न्यूज

जिवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा . सचिन खिलारी.

खरसुंडी प्रतिनिधी 

जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थीदशेपासून आत्मविश्वास आवश्यक आहे. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता असे मत अर्जुन पुरस्कार व पॅराऑलिम्पिक पदक विजेते सचिन खिलारी यांनी व्यक्त केले. खरसुंडी ता. आटपाडी येथे श्री सिद्धनाथ विद्यालयात इयत्ता दहावी व बारावी निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी के आय आय टी चे सूर्यकांत पोरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव उपस्थित होते. 

यावेळी बोलताना श्री खिलारी यांनी आपल्या बालपणापासून ते ऑलिम्पिक पदकापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला त्याचबरोबर जीवनामध्ये प्रत्येकाने आपली क्षमता ओळखून ध्येय निश्चित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अन्य विभागापेक्षा खेळामध्ये आपले करिअर घडू शकते हा विचार केल्यामुळेच अर्जुन पुरस्कारापर्यंत वाटचाल झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

तहसिलदार मदन जाधव म्हणाले की रयत शिक्षण संस्थेच्या ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत आज प्रमुख पाहुणा म्हणून येताना आनंद होत आहे. जीवनामध्ये विविध स्तरावर यश मिळवू शकलो हे रयतचे संस्कार आहेत .दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन यशस्वी होण्यासाठी त्यांनी अभ्यासाची पंचसूत्री सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष के आय आय टी रयत शिक्षण संस्थेचे समन्वयक सूर्यकांत पोरे यांनी यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती सांगितली. त्याचबरोबर दहावी व बारावीनंतर विविध शैक्षणिक वाटांबाबत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी रयत च्या माध्यमातून होत असलेल्या संगणक प्रशिक्षण व तंत्रज्ञान वापराच्या वाटचालीबद्दल आढावा घेतला. यावेळी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शिवरक्षा पवार या विद्यार्थिनीचा सचिन खिलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास दक्षिण विभाग सल्लागार विलास नाना शिंदे, सरपंच धोंडीराम इंगवले, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत पुजारी, ॲड. निळकंठ निचळ, विकास सोसायटीचे चेअरमन, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, स्कूल कमिटी सदस्य ,व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वागत व प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री एस. एस. पवार यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री आर. बी. पुजारी सर यांनी करून दिला. कार्यक्रमात तनिष्का जामदार, स्नेहल तनपुरे, संचिता भोसले ,आर्यन पुजारी, करण मोखाडे, शिवरक्षा पवार या विद्यार्थ्यांनी तसेच विलास नाना शिंदे व विश्वास पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक रणदिवे सर यांनी तर आभार डॉ. ए. एच. कोळेकर सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

खरसुंडी येथील सिद्धनाथ विधालयात बोलताना अर्जुन पुरस्कार विजेते सचिन खिलारी व्यासपीठावर मान्यवर.




    पंतप्रधानांनी केले मराठीत अभिनंदन. 

ऑलंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी" अरे सचिन बाबू अभिनंदन" या शब्दात अभिनंदन केल्याची ही आठवण यावेळी सचिन खिलारी यांनी सांगितली.

      विद्यार्थ्यांचे अनोखे योगदान 

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभावर होणारा खर्च टाळून शाळेमध्ये सुरू असलेल्या सभागृहाच्या बांधकामास बारा हजारांची देणगी दिली. विद्यार्थ्यांच्या या योगदानामुळे एक आदर्श निर्माण झाला आहे.


विद्यालयाच्या कामकाजाबाबत पालकांना शंका असतील तर प्रशासनाशी बोला काही अडचणी असतील तर संबंधितांची लवकरच बैठक घेण्यात येईल 

विलासनाना शिंदे 

सल्लागार दक्षिण विभाग.

Previous Post Next Post