सांगली : विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याबाबत आरोपीवर गंभीर कारवाई व्हावी, सोबतच विटा परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी बुधवारी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन दिले.
यावेळी खुनी हल्ला प्रकरणी आरोपींवर पत्रकाराच्या हत्येचा प्रयत्न आणि संगनमताने कट, कार्यालयातील महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन आदी गंभीर गुन्हे लागू होतात. ते व्हावेत.आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार देखील गुन्हा नोंद व्हावा व तपास उप अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवावा.
शस्त्रे, कपडे, अंगावरील जखमा, डॉकटर अहवाल, सीसीटिव्ही फुटेज या सर्वांचा तपासात वैज्ञानिक पद्धतीने वापर करून पुरावे भक्कम करण्यात यावेत. आरोपींना संघटित गुन्हेगारी कायदा मकोका, झोपडपट्टीदादा कायदा किंवा त्यांच्यापासून शहराला आणि सामान्य जनता, व्यापारी यांना गंभीर स्वरूपाचा धोका असल्याने त्यांच्यावर किमान एक वर्ष कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई करावी. त्यासाठी उप विभागीय अधिकारी यांना कागदोपत्री पूर्ततेचे आदेश देण्यात द्यावेत,
विटा परिसरातील गुन्हेगारी विरोधात मोहीम हाती घेण्यात यावी त्यासाठी जिल्ह्याचे एक पथक नेमण्यात यावे आणि लोकांच्या मनातील भीती दूर करावी. त्याबद्दल यंत्रणेने कोणाचाही दबाव घेऊ नये. विटा पोलीस ठाण्याची प्रतिमा सातत्याने घडणारे खून, अपहरण, मारहाणीच्या घटना, परागंदा आरोपी न सापडणे, ब्लॉग्ज प्रकरण यामुळे डागाळली आहे. त्याबाबतचा योग्य बंदोबस्त आपण आपल्या पातळीवर गंभीरपणे करावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
विटा येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर झालेल्या खुनी हल्ला प्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन देण्यात आले-