आटपाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध खरसुंडी ता. आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेला रामनवमी दिवशी हळदी समारंभाने सुरुवात झाली आहे. तर आज नाथाष्टमी निमित्त गोरज मुहूर्तावर श्रीनाथ जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिर तसेच जोगेश्वरी मंदिरात बैठी पूजा बांधण्यात आली होती. सकाळी नित्योपचार झाल्यानंतर परंपरेनुसार ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यास प्रारंभ झाला. आज दिवसभर जोगेश्वरी मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता लग्न सोहळ्याचे मानकरी मेटकरी यांचे मंदिरात आगमन झाले. त्यानंतर श्रींनी शाही लवाजम्यासह लग्न सोहळ्यासाठी मुख्य मंदिरातून प्रस्थान केले. जोगेश्वरी मंदिराजवळ पालखी सोहळा आल्यानंतर मंत्रोच्चारात लग्न विधी करण्यात आले. त्यानंतर मंगलाष्टका झाल्यानंतर विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर धुपारतीने बगाडासह ग्राम प्रदक्षिणा घातली व सोहळ्याची सांगता झाली.यावेळी नामदेव पाठक व सागर उपाध्ये यांनी पौराहीत्य केले.विनोद पुजारी यांनी निवेदन केले.लग्न सोहळ्या वेळी सांगलीच्या मुळे परिवारांचा सनई चौघडा, आटपाडीच्या महाराष्ट्र बँड व अश्व यामुळे वातावरण मंगलमय बनले. लग्न सोहळ्यासाठी ग्रामस्थ, सेवेकरी, मानकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणाबाबत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पालखी मार्गावरील अडथळे आजही कायम होते. याबाबत भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
विवाह सोहळ्यानंतर भाविकांना ता. २५ एप्रिल रोजी होणाऱ्या सासनकाठी व पालखी सोहळ्याचे वेध लागले आहेत.